dnyneshori-gavandi
dnyneshori-gavandi 
जिल्हा

आईच्या दशक्रिया विधीत ज्ञानेश्वरीला लाखोंची मदत

सुदाम बिडकर

पारगाव : आईचा अंत्यविधी उरकून इयत्ता दहावीचा पेपर दिलेल्या धामणी (ता. आंबेगाव) येथील ज्ञानेश्‍वरी दादाभाऊ गवंडी या विद्यार्थिनीने दाखविलेल्या धैर्याचे परिसरात कौतुक झाले होते. याबाबतचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ती व तिचा भाऊ तुषार यांच्या उच्च शिक्षणाच्या मदतीसाठी अनेकांचे हात पुढे आले. त्यांच्या आईच्या दशक्रियेच्या दिवशी नातेवाईक व ग्रामस्थांनी रोख स्वरूपात सुमारे पावणेदोन लाख रुपये मदत केली. 

दहावीच्या परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ज्ञानेश्‍वरी हिची आई सविता (वय 37) यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे गवंडी कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. आईच्या निधनानंतरही ज्ञानेश्‍वरी ही मनाची तयारी करून धीर दाखवत पेपरला गेली. या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच आहे. भाऊ तुषार यानेही नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे.

आईच्या दशक्रियेच्या दिवशी अनेकांनी या कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन केले आणि दशक्रियेचा विधी सुरू असतानाच 500 रुपयांपासून 40 हजार रुपयांपर्यंत रोख स्वरूपात मदत जमा झाली, अशी माहिती पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सरपंच सागर जाधव, श्रीकांत विधाटे व अंकुश भुमकर यांनी दिली. 

मदत करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने हनुमंत भुमकर यांनी 40 हजार रुपये, सुरेखा पारखे यांनी 21 हजार रुपये, गोरख लोंढे व राजेंद्र शेळके यांनी प्रत्येकी 11 हजार रुपये, शिवाजी विद्यालय, धामणी यांनी आठ हजार रुपये, एकनाथ लोंढे यांनी पाच हजार रुपये, उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे यांनी पाच हजार रुपये, रंगनाथ भुजबळ यांनी चार हजार रुपये, अशा प्रकारे एकूण पावणेदोन लाखांपर्यंत मदत जमा झाली. 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गवंडी परिवाराची भेट घेऊन ज्ञानेश्वरीच्या उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. संत सावतामाळी विकास मंडळ व सावित्रीबाई शिक्षण व आरोग्य प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानेश्वरी व तुषार यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे मंडाळाचे अध्यक्ष उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT